IIरात विसळून..उगवला दिसII

रात विसळून..उगवला दिस
आस दाटुनीया येई खुळी उरी
काळजाला देई रं नवी उभारी
गाडूनिया लाज रं
ढोरागत आज रं दावनीला जन्म बांधला
नवी भूक नवी तान
नवं घिऊन सपान
नवा दिस हुबा ठाकला
तोल तेचा सावराया
पुना रांगड्या जोमानं
झुंजायाचा वसा घेतला


नवा गाव नवी वेस नवी आस काळजातही
भिजतिया आसवात  तरी हितं मिठभाकरी
घरट्याची याद र
लेकराची साद रं
शिवाराची सय सोसना
नशिबाचं दान हे
बाभळीचं रान हे
पदराला भोग बांधला
राबूनिया दिस रात
गेलं सुकून रगात
घास ओठी पोचना तरी
टाचा घासूनि गुमान
चतकोरीचं सपान
अवसेच्या चांदव्या परी

कशापाई धावनं ह्ये कधी सरायची वाट ही
ऊमगलं न्हाई कवा गेली हरवूनी सावली
हरवली साथ बी
आधाराचं हात बी
बडवून ऊर फाटला
फितुरीनं का असा
नियतिनं घाव हा
जिव्हारीच आज घातला

करपूनी जन्म सात
पापण्यांच्या खाचरात
आसवांचा डोह आटला
जिन्यापरीस लाचार
अंधाराच्या येशीवर 
देह मातीमोल टांगला...
देह मातीमोल टांगला...

Comments