IIसुखांशी भांडतो आम्हीII

झोकुनी धुंदी यशाची झिंगताना
मृगजळाचा माग काढत हिडतो आम्ही
...सुखांशी भांडतो आम्ही

भासांमागुन धावत सुटतो जगायचे परी राहून जाते
हव्यासाच्या लाटांनी ते घर वाळूचे वाहून जाते
चुकले कोठे हिशेब याचा मांडतो आम्ही
...सुखांशी भांडतो आम्ही

जाती भावना करपुन जेव्हा हवे हवे ची हाव न सरते
विरुन जाती नाती केवळ व्यवहाराची चौकट उरते
चौकटीत त्या आयुष्याला कॊंडतो आम्ही
...सुखांशी भांडतो आम्ही

Comments